+९१ २२ २७५६ १२३४
१८००-२२२-९९९

नवी मुंबई महानगरपालिका

ग्रंथालय

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचे संदेश

काळजी घेणारे शहर - एक विशेष संदेश

Honorable Commissioner Kailas Shinde

श्री. कैलास शिंदे

आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, कोणत्याही शहराची खरी प्रगती ही केवळ रस्ते, इमारती किंवा पायाभूत सुविधा यांवर मोजली जात नाही, तर ते शहर आपल्या नागरिकांची किती काळजी घेते यावर ठरते. नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही विकासाची संकल्पना नागरिककेंद्रित ठेवली असून, विशेषतः समाजातील दुर्लक्षित व गरजू घटकांपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहोत.

"प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी व त्याचे जीवन अधिक सुरक्षित आणि समृद्ध व्हावे"

मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नवी मुंबई महानगरपालिका सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध आहे. समाजविकास विभागाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, या योजनांचा उद्देश नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे, त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.

या कल्याणकारी योजना महिला व बालकल्याण, मागास व दुर्लक्षित घटक, प्रकल्पग्रस्त कुटुंबे, महापालिका कर्मचारी, कंत्राटी सफाई कामगार, दगडखाण व नाका कामगार, तसेच शहरातील युवकवर्ग यांच्यासाठी राबविण्यात येत आहेत. प्रत्येक योजनेमागे एकच स्पष्ट उद्दिष्ट आहे — प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी व त्याचे जीवन अधिक सुरक्षित आणि समृद्ध व्हावे.

योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर नागरिकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विभागीय कार्यालये, मुख्यालय, होर्डिंग्ज, हस्तपत्रके, माहिती पुस्तिका तसेच वृत्तपत्रांमधील जाहीर निवेदने यांद्वारे योजनांची प्रसिद्धी करते. याशिवाय, आमचे समर्पित कर्मचारी व समूहसंघटक गावे, गांवठाण, झोपडपट्ट्या, शहरी भाग, पाडे व वस्त्या येथे प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांना योजनांची माहिती देतात व त्यांचा लाभ घेण्यास मदत करतात.

सर्व कल्याणकारी योजनांचे अर्ज विभागीय कार्यालये, समाजविकास विभाग व महापालिका मुख्यालय येथे सहज उपलब्ध करून देण्यात येतात तसेच तेथेच स्वीकारले जातात, जेणेकरून लाभार्थ्यांना अनावश्यक ये-जा करावी लागू नये किंवा कोणतीही गैरसोय होऊ नये. याशिवाय, समाजविकास विभागाच्या अनेक योजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना पोर्टलवर उपलब्ध असून, अर्ज सादर करण्यापासून ते अंतिम छाननी, मंजुरी व लाभाचे वितरण (डिस्बर्समेंट) ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवरूनच पूर्ण करण्यात येते.

ज्ञान आणि शिक्षण हे सामाजिक प्रगतीचे भक्कम आधारस्तंभ आहेत, यावर नवी मुंबई महानगरपालिकेचा ठाम विश्वास आहे. शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य वातावरण मिळावे, या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 36 ग्रंथालये व अभ्यासिका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या ग्रंथालयांमधून भावी सनदी अधिकारी, व्यावसायिक घडविण्यास मदत होत असून सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजवली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिमान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञान, समता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. या स्मारकामध्ये अद्ययावत ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट दर्शविणारी प्रदर्शने, ध्यानकेंद्र, अॅम्पीथिएटर तसेच अन्य सुविधा उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांनी या स्मारकाचा लाभ घ्यावा, असे मी आवर्जून सांगतो.

या पुस्तिकेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की, त्यांनी या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा. प्रत्येक योजना नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमधून नवी मुंबई महानगरपालिका केवळ विस्तारत नाही, तर संवेदनशीलता, समावेशकता आणि समान संधींसह विकसित होत आहे, हेच आमचे ध्येय आहे.

तुमचा सहभाग महत्वाचा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना आणि सेवांबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा

अधिक माहिती